रामदास आठवले यांनी विधानसभेच्या आठ-दहा जागांवर लढण्याचा केला दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूक पार पडून आता विविध पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. महायुतीने देखील लोकसभेचं अपयश विसरून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वळवलं आहे. अशातच महायुतीमधील घटकपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महायुतीत त्यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

आरपीआयचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी आमची उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की लोकसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आठ ते दहा जागा हव्या आहेत. मला मान्य आहे की महायुतीत भाजपाबरोबर अनेक मित्र पक्ष आहेत. परंतु, आमची आठ ते दहा जागांची मागणी आहे’. महायुतीत एकनाथ शिंदेंचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष, आरपीआय, महादेव जानकरांचा पक्ष, सदाभाऊ खोत आणि विनय कोरे यांचे पक्ष देखील आहेत. त्यात आरपीआयला आठ ते दहा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये कमी-जास्त होऊ शकतं. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही आठ ते दहा जागांची मागणी केली आहे.

 

 

Protected Content