जळगाव प्रतिनिधी । विद्यमान आमदारांना डावलण्याचा कोणताही विचार नसल्याचे वक्तव्य ना. गिरीश महाजन यांनी केल्याने जळगावातून राजूमामा भोळे हेच उमेदवार राहतील हे स्पष्ट झाले आहे.
पिंप्राळा येथील रथोत्सवाच्या प्रारंभी झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना ना. गिरीश महाजन यांनी राजकीय मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, आमदार भोळे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे तेच आगामी विधानसभेचे उमेदवार राहतील. सुरेशदादांनी उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे; परंतु, सीटिंग जागेत बदल न करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. शिवसेना व भाजपमध्ये जिल्ह्यात व शहरात कोणतेही वाद नाहीत. यावरही वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही ते म्हणाले. ना. गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने राजूमामा भोळे यांच्या उमेदवारीबाबत सुरू असणारा संभ्रम दूर झाला आहे. मात्र सुरेशदादा जैन लढणार तरी कुठून ? हा नवीन प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.