जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील पालकत्व फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार 2025 यावर्षी जामनेर तालुक्यातील गोद्री येथील आणि सध्या पुणे येथे ससून रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी या पदावर कार्यरत असलेले डॉ. मानसिंग साबळे यांच्या मातोश्री बंदरीबाई मंगलसिंग साबळे यांना स्वराज्य सरसेनापती वीरबाजी पासलकर यांचे वंशज श्रीमंत राजे राजाभाऊ पासलकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.
पालकत्व फाउंडेशन तर्फे ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीतून घडवले अशा 11 मातांचां मानपत्र सन्मानचिन्ह आणि ग्रंथतुला करून त्यांचा गौरव केला जातो. गेली सहा वर्ष हा उपक्रम चालू असून यावर्षी या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे. सदर कार्यक्रम दि. 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वा. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाला.
डॉ.मानसिंग साबळे गेल्या अनेक वर्षांपासून असंख्य गरीब रुग्णांना वैद्यकिय मदत मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. पुण्यामध्ये गरीब रूग्ण, महिला, लहानमुले यांच्यासाठी त्यांचे वैद्यकिय क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांना आजपर्यंत अनेक संस्थांकडून गौरवण्यात आले आहे. आई स्वतः अशिक्षित असुन आपली मुले उच्च शिक्षित झाली पाहिजे, त्या साठी त्या नेहमी प्रयत्नशील होत्या.अतिशय ग्रामीण भागातून आणि गरीब परिस्थितीतून, काबाडकष्ट करून मुलांना घडवले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले, आणि त्याचेच फळ म्हणून डॉ.साबळे गरीब रुग्णांसाठी एक आधार बनले आहेत . त्यासाठी त्यांना घडवणाऱ्या आईसाहेब,त्यांच्या मातोश्रींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकत्व फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विक्रम ननवरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.