मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे वडील, राजेश शाह यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी हिट अँड रन अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटात राजेश शाह शिवसेना उपनेते पदावर होते. त्यांचा मुलगा मिहीर शाह याने भरधाव गाडीने वरळीत एका महिलेला चिरडल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शाहच्या कुटुंबियांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. मिहीरला अटक झाल्यानंतर रात्री उशिरा गुन्हे शाखा ३ मध्ये आई, दोन बहिणी आणि मित्राचा जबाब नोंदवण्यात आला. अपघातावेळी गाडी चालवत असल्याची कबुली मिहीर शाहने यावेळी दिली. मिहीरच्या अटकेनंतर प्राथमिक तपासात गाडी चालवत असल्याची कबुली त्याने दिली आहे.
यात मिहीरच्या बहिणीने या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल, या भीतीने आम्ही घर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली. मिहीर आणि त्याचे कुटुंब दोन गाड्यांनी शहापूरला गेले. शहापूरला एका पंजाबी व्यक्तीने त्यांची शहापूरला राहण्याची व्यवस्था केली. या पंजाबी व्यक्तीचे शाह कुटुंबियाशी जुने आणि घरचे संबध असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.