मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदानासाठी मुंबई, ठाण्यात लोकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र होते. अगदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तब्बल पावणे दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
राज ठाकरे हे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील दादरमधील बालमोहन विद्या मंदिर शाळेत मतदान केले. मतदानासाठी सकाळी पावणे बाराच्या सुमारास ते मतदान केंद्रावर पोहोचले. राज यांच्या आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगा अमित व मुलगी उर्वशी हेही त्यांच्यासोबत होते. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांनी मतदानासाठी रांग लावली. राज यांच्या आई ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना लगेच मतदान करता आले. मात्र, राज यांना पावणे दोन तास रांगेत उभे राहावे लागले. मतदान केंद्रावर असलेली गर्दी, व्हीव्हीपॅट पावतीसाठी होणाऱ्या विलंबामुळे अखेर पावणे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर दीडच्या सुमारास राज यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, राज ठाकरे यांचे फोटो काढण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सकाळपासूनच बालमोहन शाळेच्या बाहेर गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ प्रचंड रेटारेटी झाली. वृद्ध मतदारांना केंद्रात जाता-येताना त्रास होत असल्याचे बघून पाहून राज ठाकरे मीडियाच्या प्रतिनिधींवर चांगलेच संतापले. एका कॅमेरामनला तर त्यांनी हात धरून बाजूला करत एका आजीबाईंना वाट करून दिली.