राळेगणसिध्दी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आपल्या उपोषणावर ठाम असतांना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली.
राज ठाकरे यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत त्यांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. अण्णांच्या आंदोलनामुळे आज नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आहेत. केजरीवालांनी खरंतर आज इथे यायला पाहिजे होतं असे राज म्हणाले. केजरीवाल आणि मोदी यांनी अण्णांचा उपयोग करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त्यांबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपतींना परत करणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांनी उपोषण स्थगित करावे यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना यश आले नाही.