नाशिक | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकर्यांना प्रत्येकी ५० हजारांच्या मदतीची मागणी केली आहे. यावर ना. गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंनी मागणी केली म्हणजे फार मोठे काम केले नसल्याचा टोला मारला आहे.
गुलाबराव पाटील आज नाशिक दौर्यावर आहेत. यावेळी त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करू नका, असं पाटील म्हणाले. मागणी करणं सोपं आहे. पण निर्णय पंचनाम्यानंतरच घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात ३५०० हेक्टर केळीचं नुकसान झालं आहे. अनेक घरं आणि शेतजमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासाठी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकाचा पिकपेरा वेगळा असल्याने सरसकट मदत करता येणार नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकर्यांना मदत देण्यात येईल. सरसकट पंचनामे करण्यात येत आहेत. म्हणजेच ओला दुष्काळ म्हणून सरकारने या अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. कॅबिनेटमध्ये पूर्ण माहिती आल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.