
मुंबई (वृत्तसंस्था) ईव्हीएमवर संशय आहे म्हणूनच आंदोलन करतोय. हे आंदोलन केवळं आमचे एकट्याचे नाही. हार-जीत होत असते. हार आम्हाला मान्य आहे. पण कोणी फसवत असेल तर काय करायचे? ‘कलम ३७० रद्द केले म्हणून पेढे वाटता, मग देशातील ३७१ मतदारसंघात झालेल्या घोळाचे काय? काश्मीरच्या निर्णयामुळं जिंकलो असे म्हणून ईव्हीएमचा घोळ झाकला जाईल,’ अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
‘ईव्हीएम’ मशिनमधील कथित घोळाविरुद्ध एल्गार पुकारणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. मुंबईत आज झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कलम ३७० रद्द केले. आता काश्मीरच्या निर्णयामुळं जिंकलो असे म्हणून ईव्हीएमचा घोळ झाकला जाईल. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ते मान्य केलंय. पुढे काय होणार याची धाकधूक सर्वांनाच आहे,’ असे राज म्हणाले. मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत संमत करून घेतलेल्या कायद्यांचे दाखले देत राज यांनी सरकारच्या हुकूमशाहीवर हल्ला चढवला. आरटीआय कायद्यात बदल करून सरकारने सर्वसामान्यांचा माहितीचा अधिकारच काढून घेतला आहे. माहितीचा अधिकार केंद्र सरकारने स्वत:च्या ताब्यात घेतलाय आणि केंद्र म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून नरेंद्र मोदी व अमित शहा आहेत. सगळे हेच दोघे ठरवत आहे. कुठे आहे लोकशाही,’ असा प्रश्न राज यांनी केला.