नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सध्या पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजप महायुतीत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता महायुतीत शिंदे, अजित पवार यांच्यासोबत राज ठाकरे महायुतीत सामील होतील का अशा चर्चामुळे महाराष्ट्रातील राजकारणाच्या घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची मागील काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. दरम्यानच्या काळात मनसेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी देखील घेतल्या. आता थेट राज ठाकरेंना दिल्लीत बोलवण्यात आले.
महायुतीत सामील होण्याच्या मुद्दयांवर मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे हे दिल्लीला पोहचले आहेत. तिथे त्यांनी केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी अमित शहा यांना भेटण्यापूर्वी भाजपचे लोकसभा संघटक विनोद तावडे यांची सुध्दा भेट घेतली. यादरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काही तासांत सर्व स्पष्ट होईल, राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्याच्या, पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचेच असेल. ते जे आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही कर्तव्य म्हणून पालन करू असे म्हणाले.