नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या (१४ सप्टेंबर) सोमवारपासून प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर कोरोनाविषयक निकषांचे तसेच भौतिक दूरतेच्या नियमांचे पालन करत यावेळी अभूतपूर्व परिस्थितीत हे अधिवेशन होत आहे.
1 ऑक्टोबरपर्यंत चालणार्या या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या 18 बैठकी होणार आहेत. यावेळच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास होणार नसून, शून्य तासाचा कालावधीही अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. अनेक महत्त्वपूर्ण विधेयक तसेच शासकीय कामकाजावर सरकारचा भर राहणार आहे. संसदभवन परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज एकाच वेळी नाही, तर अलगअलग वेळेला होणार आहे. उद्या पहिल्या दिवशी लोकसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळात तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळात होणार आहे. मंगळवारपासून राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते 1 तर लोकसभेचे कामकाज दुपारी 3 ते 7 या वेळात होणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी अधिवेशनाला शनिवार आणि रविवारीही सुटी राहणार नाही.
पावसाळी अधिवेशनात सहभागी होणार्या खासदारांना कोरोनाविषयक चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. लोकसभा तसेच राज्यसभा सचिवालयाचे कर्मचारी आणि माध्यमांच्या लोकांनाही कोरोना चाचणी आवश्यक करण्यात आली आहे.