मुंबई प्रतिनिधी । उपनगरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे. तसेच आज आणि उद्या कोकण किनारपट्टीसह मुंबई व ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार असून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत आहेत. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या 2 दिवसात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समुद्रालाही आज दुपारी मोठी भरती येणार असल्याने नागरिकांना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.