नवी दिल्ली, वृत्तसंस्था | रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गांभिर्याने घेतला असून मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनच्या ५८ हजार ६०० डब्यांमध्ये २०२२ पर्यंत कॅमेरे लावण्याची तयारी सुरू झाली आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही.के. नायडू यांनी ही माहिती दिली. या सुरक्षा यंत्रणेसाठी कृत्रिम इंटेलिजनस आणि चेहरा ओळख प्रणाली (फेस रिकग्नायझेशन) सॉफ्टवेअरचा वापर केला जाऊ शकतो, असेही नायडू यांनी सांगितले आहे. या द्वारे गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणे सोपे जाणार आहे.
या वित्तीय वर्षात रेल्वे दुर्घटनांमध्ये कोणत्याही प्रवाशाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडलेली नाही, अशी माहितीही रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली. तथापि, आर्थिक दृष्टीने विचार करता रेल्वेची स्थिती फार चांगली नसल्याचे नायडू यांनी मान्य केले आहे. या वर्षी रेल्वेचे ऑपरेटिंग प्रमाण १२१ टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ११३ टक्के इतके होते.
सीसीटीव्हीमुळे प्रायव्हसी भंग नाही
रेल्वेच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतर प्रवाशांच्या प्रायव्हसीचा भंग होणार नाही, असे नायडू म्हणाले. हे कॅमेरे गाडीचे सर्व डबे आणि दरवाजांच्या वर लावण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या प्रायव्हसीशी कोणत्याही प्रकारची तडजोड करता येणारच नाही, असेही नायडू यांनी स्पष्ट केले आहे.
चेहरा ओळख प्रणाली
गुन्हेगारांना पकडण्यासाठी रेल्वे आधुनिक तांत्रिक प्रणालींच्या प्रयोगांवर जोर देत आहे. रेल्वे सुरक्षा दल चेहरा ओळख प्रणाली पद्धतीला गुन्हेगारांचे डेटा रेकॉर्डला जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. रेल्वे डबे आणि स्थानकांवर फिरणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे कृती कार्यक्रम तयार करत आहे.