मुक्ताईनगर, पंकज कपले | तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळील हॉटेलच्या मागे मुक्ताईनगर पोलिसांनी छापा टाकून साडे तेरा लाखांचा ऐवज जप्त करून १४ जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई काल रात्री उशीरा करण्यात आली आहे.
या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीला मुक्ताईनगर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पुरनाड फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रावसाहेबच्या मागील बाजूला पोलीस पथकाने छापा टाकला. यात सदर हॉलमध्ये जमाव झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. या छाप्यात जुगार खेळणार्यांजवळ १ लाख ७० हजार २२० रूपयांच्या रोकडसह तीन चारचाकी, दोन दुचाकी, १३ स्मार्टफोन, पत्त्यांच्या कॅटसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली. याचे एकूण मूल्य हे १३ लाख ५२ हजार २२० रूपये इतके आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकाच्या पथकाने संजय गजमल मराठे, (वय ३९ रा पुर्णाड); गजानन भिमराव सोनवणे, ( वय ५९ रा. मुक्ताईनगर) ; संतोष नथ्थु खुरपडे (वय ३३ रा मुक्ताईनगर ); कैलास वासुदेव जाधव, ( वय ३८ रा वडोदा ता मुक्ताईनगर ); विजय नारायण परगरमोर, (वय – ४२, रा शेगाव जि. बुलडाणा) ; मोहम्मद आसिफ मोहम्मद ताहीर, (वय – ३७ रा. शेगाव ); रविंद्र सदाशिव शिरोडकर (वडोदा ता. मुक्ताईनगर ); मोहम्मद मोहसिन खान, (वय ४०, रा शेगाव); गजानन मनोहर शंखे, (वय – ४०, रा शेगाव ); महादेव धनसिंग राठोड, (वय ४१ रा. कान्हेरी गवळी ता. बाळापुर जि. अकोला ) पारसकर, वय – (५२,रा भोटा ता नांदुरा जि.बुलडाणा); अनिल नामदेव कोळी, (वय – ५० रा टहाकळी); राजेश सिताराम वाकोडे, (वय ५० रा नांदुरा) आणि सुरेश रामदास लोखंडे, (वय २९ रा. वडोदा ) या १४ संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रात्री दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली.
या संदर्भात मुक्ताइगर पोलीस स्थानकात कार्यरत पोलीस नाईक विकास मुकुंदा नायसे यांनी फिर्याद दिली. यानुसार, जितेंद्र सुभाष पाटील (रा. विटवा, ता. रावेर) यांनी आपल्या हॉलमध्ये जुगार अड्डा चालविल्याच्या कारणावरून त्यांच्यासह वर नमूद केलेल्या १४ जणांच्या विरूध्द महाराष्ट्र जुगार ऍक्टमधील कलम ४ आणि ५ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वरील १४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे हे करीत असल्याची माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीला पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पुरनाड फाटा परिसरातील जुगार अड्डयांवर अनेकदा कारवाई करण्यात आली असली तरी याचा पूर्ण बंदोबस्त होत नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, मुक्ताईनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे नंबर दोनच्या मंडळीचे नक्कीच धाबे दणाणणार आहे.