Home Uncategorized ट्रॅक्टरचे बनावट सुटे पार्टस विक्री करणाऱ्या दुकानावर छापा !

ट्रॅक्टरचे बनावट सुटे पार्टस विक्री करणाऱ्या दुकानावर छापा !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नाव आणि लोगो वापरून बनावट ट्रॅक्टरचे सुटे भाग (पार्ट्स) विकणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता एस.टी. वर्कशॉपसमोरील ‘शहनशाह ट्रॅक्टर अँड अर्थ मुव्हर्स’ या दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १३ हजार ६१५ रुपयांचे बनावट उत्पादने जप्त करण्यात आला. याबाबत रात्री ११ वाजता दुकानमालक दीपक नंदलाल पोपली (वय ३२, रा. गणपती नगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, या दुकानात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या नावाचा गैरवापर करून ट्रॅक्टरचे सुटे भाग विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, कंपनीचे अधिकारी हंबीरराव ज्ञानू साठे (वय ६१, रा. मुंबई) यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दुकानाची तपासणी केली. तपासणीत महिंद्रा कंपनीचे नाव असलेले बनावट ऑईल फिल्टर, एअर फिल्टर आणि कापडी हूड असे साहित्य आढळून आले.

पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट साहित्याची एकूण किंमत १३ हजार ६१५ रुपये आहे. या प्रकरणी दुकानमालक दीपक पोपली याच्याविरुद्ध कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बनावट साहित्य विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना एक कठोर संदेश मिळाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करत आहेत.


Protected Content

Play sound