मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातून जाणाऱ्या मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर टोल नाक्याजवळ पोलिसांनी एका जुगार अड्डयावर छापा टाकून सुमारे 1 लाख 47 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावरील टोल नाक्याच्या परिसरात अनेक जुगार अड्डे असून राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर फारशी कठोर कारवाई होत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. या अनुषंगाने आज मुक्ताईनगर पोलिसांना टोल नाक्याजवळ साईराज धाब्याच्या मागील बाजूला असलेल्या खोलीत पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक तयार करून या ठिकाणी छापा मारण्यात आला. याप्रसंगी काही जुगारी हे झन्ना-मन्ना हा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पत्त्यांच्या कॅटसह रोकड रक्कम व अन्य सामग्रीसह सुमारे 1 लाख 47 हजार सहाशे रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस स्थानकात शांताराम जीवराम मंगळकर ( रा. लाल रेल्वे स्थानकाजवळ, बऱ्हाणपूर); गणेश वसंत पाटील ( रा. पुरनाड ता. मुक्ताईनगर); महेंद्र बापूराव नाईक (रा. जुने गाव, मुक्ताईनगर); युवराज संतोष महाजन (रा. निंभोरासीम, ता. रावेर); सुनील किसन बेलदार ( रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर); राजेश सिताराम वाकोडे (रा. नांदुरा, जिल्हा बुलढाणा ) आणि जागा मालक आणि अन्य सहा अनोळखी संशयित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सागर सावे, राजेश महाजन, विशाल पवार, संतोषकुमार भारूडे, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.