नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी सकाळी पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु राष्ट्रीय कार्यकारणी त्यांचा राजीनामा फेटाळल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. लोकसभा निवडणुकीत वेळोवेळी भाजपकडून सातत्याने काँग्रेसमधील गांधींच्या घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचा मोठा फटका पक्षाला निवडणुकीत बसला होता. त्यामुळे गांधी घराण्याबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याचा विचारही यानिमित्ताने सुरु होता. त्यासाठी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत, ज्योतिरादित्य शिंदे, मल्लिकार्जून खरगे आणि तरुण गोगोई यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. परंतु, राहुल गांधींचा राजीनामा फेटाळण्यात आला. काँग्रेसच्या या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे, सोनिया गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, प्रियंका गांधी, मीरा कुमार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, गुलाम नबी आझाद हे नेते दिल्ली स्थित कार्यालयात उपस्थित आहेत.