नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच दक्षिण भारतातील केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राहुल यांच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसने आज अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
काँग्रेसकडून आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधून याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ”काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. ते केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हे सांगताना मला आनंद होत आहे.”असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांनी सांगितले. केरळमधील वायनाड हा मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा मतदारसंघ केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा तीन राज्यांना जोडतो. केरळ काँग्रेस कमिटीने राहुल यांना वायनाडमधून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ पासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या मतदार संघात कन्नूर, मलाप्पूरम आणि वायनाडचा समावेश असून २००८ पासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे.