जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी ‘अॅन्टी रॅगिंग सप्ताहा’ची सुरुवात करण्यात आली आहे. हा आठवडाभर चालणारा उपक्रम महाविद्यालय परिसरात रॅगिंगला पूर्णविराम देऊन विद्यार्थ्यांमध्ये स्नेह, आदर आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.

सप्ताहाचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा. डॉ. बापूराव बिटे यांनी ‘अॅन्टी रॅगिंग डे’ निमित्त मार्गदर्शन केले. त्यांनी रॅगिंगच्या सामाजिक, मानसिक आणि शैक्षणिक परिणामांवर प्रकाश टाकत प्रत्येक विद्यार्थ्याने परस्पर सन्मान आणि सौहार्द जपण्याचे आवाहन केले. “रॅगिंग हा केवळ कायद्याने दंडनीय गुन्हा नसून, तो मानवतेच्या मूल्यांना हरवणारे कृत्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सप्ताहात विविध उपक्रम:
या सप्ताहात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सेमिनारमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी रॅगिंगविरोधी कायदेशीर तरतुदी, विद्यार्थी हक्क आणि उपाययोजना याबद्दल माहिती दिली. आज, १४ ऑगस्ट रोजी शॉर्ट फिल्म प्रदर्शन होणार असून, त्यातून रॅगिंगचे गंभीर परिणाम प्रभावीपणे दाखवले जातील. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली काढण्यात येईल, ज्यात विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी ‘रॅगिंग बंद करा – मैत्री वाढवा’ अशा घोषणा देतील. १६ ऑगस्ट रोजी पोस्टर प्रदर्शन आयोजित केले असून, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्समधून रॅगिंगविरोधी संदेश दिले जातील. १७ ऑगस्ट रोजी स्लोगन सादरीकरण स्पर्धा आणि सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, १८ ऑगस्ट रोजी निबंध लेखन स्पर्धा होईल.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले की, “हा सप्ताह केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे परस्पर विश्वास, आदर आणि स्नेहपूर्ण वातावरणाची निर्मिती होईल.” या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅन्टी रॅगिंग समिती, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. या सप्ताहामुळे महाविद्यालयात सुरक्षित आणि रॅगिंगमुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. माया आर्विकर, डॉ. विलास चव्हाण यांच्यासह समिती सदस्य आणि विद्यार्थी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.



