मुंबई (वृत्तसंस्था ) पुत्र सुजय विखे पाटील यांनी गाजावाजा करत केलेल्या भाजप प्रवेशानंतर काही दिवसांतच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा सोपवला आहे. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
मुलाने भाजपत प्रवेश केला असला तरी देखील आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार नाही असे पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी स्पष्ट केले होते. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू असेही विखे म्हणाले होते. पुत्र सुजय यांनी आपल्याला न सांगताच हा निर्णय घेतल्याचे म्हणत विखे पाटील यांनी हा मुद्दा बाजूला सारला होता.
अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी विखे पाटील आपले पुत्र सुजय विखे पाटील यांच्यासाठी आग्रही होते. पक्षश्रेष्ठींकडे तसा शब्दही त्यांनी टाकला होता. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवण्यास इच्छूक होता. विखे पाटील यांनी प्रयत्न करूनही अहमदनगरची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही ही जागा प्रतिष्ठेची करत ती आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले. या मुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नाराज झाले होते. लवकरच विखे पाटील यांचे पुत्र सुजय भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चाही सुरू झाली होती. सुजय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. सुजय विखे यांनी राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करेल का किंवा राधाकृष्ण स्वत: राजीनामा देतील का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विखेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा का दिला, स्वत:च दिला की, पक्षाने तशी मागणी केली. याबाबत मात्र काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळलं आहे. आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही, असं विखे-पाटील यांनी स्पष्ट केलंय.