पारोळा प्रतिनिधी । चाळीसगाव येथे अवकाळी पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्ण संसारच उध्वस्त झाले. अश्या परिस्थितीत रा. स्व. संघासह अन्य राष्ट्रीय विचारांच्या संस्था संघटनांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.
तालुक्यातील २ उपखंडांमधील (रांजणगाव आणि वाघळी) ४ मंडळात (वाघळी, रांजणगाव, वाघडू आणि पिंपरखेड) या नसर्गिक आपत्तीचा परीणाम झाला आहे. तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना काय काय मदत हवी आहे, याचे सर्वेक्षण केले व अश्या सर्व वस्तूंची तजवीज करण्यात आली आहे.दि. ३१ ऑगस्ट रोजी कन्नड घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. अश्यावेळी वेळ न दवडता परिस्थितीचे अवलोकन करत संघ स्वयंसेवकांनी तातडीने १०० जेवणाचे डबे, २०० पाणी बॉटल व बिस्कीट पुढे प्रशासनाच्या मदतीने पाठवले.आज (दि. २सप्टेंबर) हळूहळू जनजीवन सुरळीत होत असताना नागरिकांना शिधा वाटप, किराणा सामान, कपडे, वह्या पुस्तके व अन्य जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या जात आहे.आतापर्यंत एकूण ४० कुटुंबाचे सर्वेक्षण करून प्रत्यक्षात त्यांना १५ दिवस पुरेल असा शिधा वाटप आणि संसारपयोगी वस्तूंचे वाटप करून मदत देण्यात आली. समाज संकटात असताना मदतीला धावून जात स्वयंसेवकांनी नेहमीप्रमाणे आपली तत्परता दाखवली आहे.