जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उत्साहाला नवे बळ देणाऱ्या ‘पायरेक्सिया २०२६’ या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा मंगळवारी थाटात शुभारंभ झाला. अधिरथ बॅचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने संपूर्ण महाविद्यालय परिसरात क्रीडाभावना, उत्साह आणि स्पर्धात्मक वातावरण अनुभवायला मिळाले.

२७ ते ३१ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या ‘पायरेक्सिया २के२६’ अंतर्गत व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आणि फुटसल अशा विविध लोकप्रिय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणातील ताणतणावातून विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळावी, संघभावना वृद्धिंगत व्हावी आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्यासह प्राध्यापकवर्ग, डॉक्टर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद करत, अशा क्रीडा उपक्रमांमुळे नेतृत्वगुण, शिस्त आणि संघभावना विकसित होते, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडाक्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील यांनी ‘पायरेक्सिया’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे सांगत आयोजकांचे कौतुक केले. महाविद्यालय प्रशासन व अधिरथ बॅचच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.



