पुणे प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर सर्वांना उत्सुकता लागली ती निकालाची. मात्र पुण्यासह राज्यातील काही उमेदवारांनी निकाला तीन दिवस बाकी असतानाच फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर विजयाची घाई झालेल्या उमेदवारांनी फटाके फोडत जल्लोष केला. पुण्यातील शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी मतदान झाल्यानंतर त्यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी शिरोळे विजयी होणार असल्याचा दावा करत गोखले नगरमध्ये फटाके फोडले. दुसरीकडे कागलमध्येही विजयाआधी फटाके फोडण्यात आले. राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनीही मतदान संपल्यानंतर विजयी मिरवणूक काढली. यावेळी गुलाल उधळत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दापोलीतून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनीही विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. मात्र, या उमेदवारांनी निकालाआधीच फटाके फोडून गुलाल उधळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतदान झाल्यानंतर विजयी होणार असल्याचं सांगत फटाके फोडले होते. त्यानंतर निवडणूक निकालातून त्यांचा दावा खरा ठरला होता. तसाच काहीसा निकाल शिवाजी नगर, कागल आणि दापोलीत लागणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.