मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत असलेले मनोज दादा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला मुक्ताईनगर तालुक्यातील सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. समाजाच्या वतीने एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांना तहसिलदार मुक्ताईनगर यांच्यामार्फत एक निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जाहीर पाठींबा देत सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. “मा. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलने, मोर्चे आणि उपोषण केले आहेत. मराठा समाजाने त्यांना मोठा पाठिंबा दिला असून, त्यांचे हे आंदोलन एकीकडे समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील आंदोलने आणि चर्चा प्रक्रियेत सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यामुळेच जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सकल मराठा समाजाने त्यांच्या या उपोषणाला पूर्णतः पाठींबा दिला असून, सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
“मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधव या लढ्यात एकत्रित आहेत आणि जरांगे पाटील यांच्या संघर्षाला सन्मान आणि आदराने पाहत आहेत,” असे तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. याप्रसंगी सकल मराठा समाज मुक्ताईनगर, मराठा सेवा संघ मुक्ताईनगर, व तालुक्यातील मराठा समाज हा बहुसंख्येने उपस्थित होता.