शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीज ग्राहकांना इंटरनेट तसेच मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन वीज बिल भरण्यास सहकार्य करण्यासाठी महावितरणच्या शेगाव उपविभागीय कार्यालयात ‘ग्राहक मदत कक्ष ‘तयार करण्यात आले आहे. महावितरण संकेत स्थळ,महावितरण ॲपद्वारे क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत वीज बिल कसे भरावे याबाबत या मदत कक्षात मदत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून महावतिरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबील भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.
महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येवू शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त महावितरणने रु.५,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा निशुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००/-) इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस रिझर्व बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतूदी लागू आहेत. अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनात ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्यास मदत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता अजयसिंह मोहता यांच्या नेतृत्वात मधुकर पेटकर, चंद्रकांत गावंडे,रोहिणी, पाटील, राकेश चौधरी बलराज खानदे , स्वाती भोसले, शुभम सुंदरसे, वैभव सरप, पंकज शेगोकार, शरद करे, सुशील कराडे, प्रणव रोहनकार हे मार्गदर्शन करत आहेत.
स्वातंत्र्य दिनी शेगाव येथे महावितरण डीजीटल सेवांचा जागर
वीजबिल भरण्यापासुन तर मीटर रिडींग पाठविण्यापर्यंत महावितरणच्या सर्व सेवा आत ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्ट २०२३ देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महावितरण उपविभागीय कार्यालय शेगांव येथे उपकार्यकारी अभियंता श्री.अजयसिंग मोहता यांच्या नेतृत्वात शेगांव शहरामध्ये महावितरणच्या विशेषता ऑनलाईन वीजबिल भरणा व इतर सर्व डीजीटल सेवांचा मोटार सायकल रॅली काढून जागर करण्यात आला.महावितरणच्या विविध सेवांचे पोस्टर्स,बॅनर्स आणि घोषणेमुळे महावितरणची रॅली शेगाव नगरवासियांसोबत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या हजोरो भक्तांचे आकर्षण ठरली.