वक्फ कायद्याच्या विरोधात सावद्यात जनजागृती सभा

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार आणि सावदा – फैजपूर परिसरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सावदा येथील जोहरा हॉलमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, कायदेपंडित, सामाजिक कार्यकर्ते, आणि धार्मिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वक्फ कायदा २०२५ राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतरित झाला आहे. या कायद्यामध्ये वक्फ मालमत्तांवरील सरकारी नियंत्रण वाढवले गेले असून, मुस्लिम समाजाने त्याला संविधानविरोधी ठरवले आहे. समाजातील विविध वक्त्यांनी कलम १४, २१, २४, २५, २६(ब) चा उल्लेख करत, या कायद्यामुळे मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक हक्कांना गालबोट लागत असल्याचे स्पष्ट केले.

या सभेचे अध्यक्ष अयाज अली होते. यावल येथील खलील अहमद यांनी शिक्षणावर भर देण्याचे आवाहन करताना म्हटले की, समाजाला शिक्षणाच्या माध्यमातूनच सशक्त बनवता येईल. डॉ. रागीब अहमद यांनी लोकशाहीच्या चारही स्तंभांवर सरकार हस्तक्षेप करत असल्याचे सांगत वक्फ कायद्याविरोधात लोकसभेत २३२ खासदारांनी विरोध दर्शविला होता, हे अधोरेखित केले.

सोहेल आमीर यांनी २०१४ नंतर देशात अस्थिरता वाढल्याचा आरोप करत, शासन हिंदू-मुस्लिम शांततेला धोका पोहोचवत असल्याचे सांगितले. मुफ्ती हारून नदवी यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले की, मुस्लिम समाज शांततापूर्ण संविधानिक मार्गाने लढा देईल, पण अन्याय सहन करणार नाही.

इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी वक्फ कायद्यामध्ये मुस्लिम समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप केला. त्यांनी सरकारकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे चित्र रंगवले जात असल्याचे निदर्शनास आणले. ते म्हणाले की, देशात अनेक मंदिर ट्रस्टकडे वक्फ बोर्डापेक्षा अधिक मालमत्ता असूनही लक्ष फक्त मुस्लिमांकडेच वळवले जात आहे.

या वेळी भीम आर्मीचे रमाकांत तायडे यांनी देखील आपला विरोध नोंदवला. अध्यक्षीय भाषणात अयाज अली यांनी या कायद्याला “काळा कायदा” म्हणत, मुस्लिम विरोधी षडयंत्र असल्याचा आरोप केला आणि सरकारने हा कायदा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा देशभर आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबीर मुस्तफा आबादी यांनी केले आणि आभारप्रदर्शन सय्यद जावेद यांनी मानले.

Protected Content