Home Cities जळगाव जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात जनजागृती

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात जनजागृती


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने जळगाव येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोगाबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागामार्फत आयोजित या उपक्रमातून क्षयरोगाच्या प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचाराबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

दरवर्षी २४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक क्षयरोग दिनाचे महत्त्व अधोरेखित करत यंदाच्या ‘होय! आपण क्षयरोग संपवू शकतो: देशांच्या नेतृत्वाखाली, लोकांच्या सामर्थ्याने’ या थीमनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या थीमद्वारे देशांचे नेतृत्व आणि जनसहभाग यांच्या बळावर क्षयरोग निर्मूलन शक्य असल्याचा ठोस संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे रेसिडेंट डॉ. सौरव मुले यांनी ‘क्षयरोग: सद्य आव्हाने आणि निर्मूलनासाठीच्या रणनीती’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी क्षयरोगाची लक्षणे, आधुनिक निदान पद्धती, उपलब्ध औषधोपचार आणि औषधांचा पूर्ण कोर्स घेण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्यसेवक, विद्यार्थी आणि समाजाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यानंतर विद्यार्थ्यांसाठी रिल्स सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी क्षयरोगाविषयी जनजागृती करणारे सर्जनशील आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केले. विद्यार्थ्यांचा उत्साह, सामाजिक आरोग्याविषयीची संवेदनशीलता आणि जनजागृतीसाठीची बांधिलकी यावेळी प्रकर्षाने जाणवली.

संपूर्ण कार्यक्रम माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला. क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात जनजागृती, वेळेवर निदान आणि योग्य उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound