

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय अभिजात संगीताचे गाढे अभ्यासक आणि पुनरुज्जीवन करणारे दोन द्रष्टे संगीतोद्धारक — पं. विष्णू नारायण भातखंडे आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर — यांच्या स्मृती प्रित्यर्थ जळगावात दरवर्षी आयोजित होणारा “संगीत के प्रणेता” स्मृती संगीत समारोह यंदा प्रथमच दोन दिवसांच्या विस्तृत कार्यक्रमासह संपन्न होणार आहे. विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाच्या वतीने हा संगीत महोत्सव १७ आणि १८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून, शहरातील तसेच जिल्ह्यातील संगीतप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन विवेकानंद प्रतिष्ठानच्या संगीत विद्यालयात होणार असून, त्यामध्ये विद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांसह जळगाव शहर आणि परिसरातील – विशेषतः भुसावळ, पाचोरा, जामनेर येथील – संगीत शिक्षक आपल्या शिष्यांसह सहभागी होणार आहेत. शास्त्रीय गायन, वादन, उपशास्त्रीय सादरीकरण आणि नृत्याच्या कार्यक्रमांमुळे या दोन दिवसांत रसिकांना विविध रागांमधून सांगीतिक अनुभूती मिळणार आहे.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांतर्फे विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे आणि संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सुयोग कॉलनीतील विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयात महोत्सवाचा औपचारिक शुभारंभ होणार असून, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता भैरवी रागाच्या सादरीकरणासह महोत्सवाचा समारोप होईल.
संगीतप्रेमी रसिक, कलासाधक विद्यार्थी, गुरुजन, शिक्षक, पालक व जळगावातील नागरिकांनी या सांगीतिक उत्सवात उपस्थित राहून अभिजात भारतीय संगीताची अनुभूती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय सांगीतिक परंपरेचे संस्कार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून, पं. भातखंडे आणि पं. पलुस्कर यांचे कार्य नव्या पिढीसमोर प्रेरणादायी स्वरूपात उभे राहत आहे.



