शेंदूर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथिल मराठा कुणबी पाटील समाजसेवा बहुद्देशीय मंडळातर्फे गोंडगाव येथील घटनेचा निषेध करत त्या नराधमाला कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर अत्याचार करून तिची क्रूर हत्या केल्याने सर्वत्र समाजमन सुन्न झाले आहे. या अमानवीय क्रूर घटनेने जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, शेंदूर्णी येथे मराठा समाजातर्फे आज दिनांक ११ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावाने शेंदूर्णी पोलिस दुरक्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी निवेदनाच्या माध्यमातून खटला जलद गती न्यायालयात चालविणे , प्रख्यात विधितज्ञ ऍड उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची तसेच सबळ व भक्कम पुराव्यांची जुळवणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समाज मंडळ सदस्यांसह मोठया संख्येने समाज बांधव व युवक उपस्थित होते.
यावेळी समाज मंडळ अध्यक्ष विलास अहिरे व तुकाराम पाटील यांनी समाजाचा आक्रोश व तीव्र भावना शासनाच्या पर्यंत पोहचवाव्या अशी मागणी निवेदन देतांना केली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे वतीने निवेदन स्वीकारून मराठा समाजाच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले. निवेदनाच्या प्रतीवर मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी सह्या केल्या आहेत.