वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव शहर प्रदूषणामुळे त्रस्त असून, या समस्येवर उपाययोजना व्हाव्यात यासाठी स्थानिक तरुणांनी शक्तिगडावर धडक दिली. १० मार्च रोजी दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या परिसरात या तरुणांनी जोरदार आंदोलन केले. या वेळी डी वाय सी कुंभार यांना धारेवर धरत प्रदूषणग्रस्त वरणगावकरांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. अखेर, मुख्य अभियंता भदाणे यांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
वरणगाव शहरावर दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पातून होणाऱ्या राखेच्या प्रदूषणाचा मोठा परिणाम होत आहे. १०८ फूट उंचीचा तिरंगा ध्वज राखेमुळे अवघ्या एका महिन्यात खराब होतो. तसेच, प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. वीजनिर्मिती केंद्राच्या तापमानामुळे घातक आजार उद्भवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याविरोधात आवाज उठवत स्थानिक तरुणांनी तिरंगा आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. उलटपक्षी, ४५ तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती आंदोलकांनी दिली.
या पार्श्वभूमीवर १० मार्च रोजी वरणगावच्या तरुणांनी शक्तिगडावर धडक देऊन प्रदूषणाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. डी वाय सी कुंभार यांच्याशी चर्चा करताना आंदोलकांनी मुख्य अभियंता भदाणे हे सध्या मुंबईत असल्याने १२ मार्च रोजी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन घेतले.
या आंदोलनात नगराध्यक्ष सुनील काळे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, किरण धुंदे, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष योगेश माळी, कृष्णा महाजन, पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मयूर शेळके, कामगार नेते मिलिंद मेढे, मुस्लिम अन्सारी, सुभाष पोतदार, भोजराज पालवे, संदीप माळी, नितीन गोसावी, अनिल काळे, नितीन भाई यांच्यासह असंख्य तरुण उपस्थित होते.