फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल ‘उदयपूर फाईल्स’ नावाच्या चित्रपटात आक्षेपार्ह चित्रीकरण आणि संवाद दाखवून जगातील मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत, कौमी एकता फाउंडेशनने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध दर्शवला आहे. ११ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे आणि चित्रपट दिग्दर्शक अमित जानी यांच्यासह संबंधित सर्वांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.

फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, अमित जानी यांनी त्यांच्या जानी फायरफौक्स फिल्म कंपनी मार्फत ‘उदयपूर फाईल्स’ हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरण आणि संवादांमुळे केवळ मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाहीत, तर देशात जातीय तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

कौमी एकता फाउंडेशनने या चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबवण्याची मागणी केली असून, अमित जानी आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९५-ए (धार्मिक भावना दुखावणे), २९८ (धार्मिक भावना दुखावण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न), १५३-ए (धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे) आणि ५०५ (सार्वजनिक उपद्रव निर्माण करणारी विधाने) अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सध्या इस्लाम धर्माविषयी आणि मुस्लिमांना बदनाम करण्याचा देशातील काही धर्मांध घटकांमध्ये ट्रेंड सुरू असल्याचा आरोपही फाउंडेशनने केला आहे. हा प्रकार कदापि सहन केला जाणार नसून, याविरोधात कायदेशीर लढा दिला जाईल, अशी भूमिका कौमी एकता फाउंडेशनने घेतली आहे. या मागणी संदर्भात फैजपूर प्रांताधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी कौमी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान, सैय्यद असगर, सचिव सय्यद जावेद, कलीम खा, शेख हमीद, शेख अख्तर, शेख निसार, शेख कलीम, फिरोज खान, शेख साबीर, शेख रियाज आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



