जळगाव प्रतिनिधी । भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात सुर उमटण्यास प्रारंभ झाला असून त्यांचे तिकिट रद्द करण्या यावे या मागणीसाठी आज भाजप कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
आमदार संजय सावकारे यांना भाजपच्या पहिल्याच यादीत स्थान मिळाले असून ते कामालादेखील लागले आहेत. तथापि, त्यांच्या विरूध्द भाजपमधील एक गट कार्यरत झालेला आहे. तर, सामाजिक कार्यर्त्यांनीदेखील त्यांच्या विरूध्द मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमिवर, आज सामाजिक कार्यकर्ते छोटेलाल हरणे यांनी आज चक्क उपोषणाचे अस्त्र उपसले. त्यांनी आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्या जळगाव येथील जिल्हा कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यांच्यासोबत काही सहकारीदेखील होते. यामुळे खळबळ उडाली. अखेर दुपारी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. याप्रसंगी जिल्हाध्यक्षांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संजय सावकारे यांनी आमदार म्हणून कोणतेही जनहिताचे काम केले नाही. मात्र रेल्वे परिसरात तब्बल ७० वर्षांपासून असलेल्या वसतीला अतिक्रमण ठरवून तोडल्याचे पाप केले. यामुळे हजारो आबालवृध्दांना विस्थापित व्हावे लागले. या विस्थापितांना मदत करण्यासाठी सावकारे यांनी कोणताही पुढाकार घेतला नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. यामुळे संजय सावकारे यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे. दरम्यान, निवेदन स्वीकारल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या उपस्थितीत उपोषण सोडविण्यात आले.