पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील तामसवाडी गाव व परिसरातील कुख्यात गुन्हेगार हेमंत उर्फ नाटया मच्छिंद्र पवार याला जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील तामसवाडी आणि परिसरात नाटया पवार याचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याने, त्याचा स्थानिक शांततेवर विपरित परिणाम होत होता. यामुळे त्याला स्थानबद्ध करण्याबाबतचा अहवाल पोलीसांनी तयार करून जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठविला. पोलीस अधिक्षक रेड्डी यांनी अहवालाचे अवलोकन करून हा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे मंजूरीसाठी रवाना केला. त्यानुसार स्थानबध्द करण्याबाबतच्या अहवालाने मंजूरी मिळाल्याने सराईत गुन्हेगार नाट्या पवार याला कोल्हापूर कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीसांचे आवाहन :
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणतीही बेकायदेशीर हालचाल आढळल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.