जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कांचन नगर परिसरातील शिवशंकर नगरात बंद घर फोडून सोन्याचे दागिने असा एकुण ६३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ भगवान सपकाळे (वय-५८) रा. शिवशंकर नगर, कांचन नगर परिसर,जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी ते नातेवाईकांकडे घर बंद करून बाहेरगावी गेले होते.
मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने असा एकुण ६३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडकीला आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकनाथ सपकाळे यांनी घरात येवून पाहणी केली असता घरात सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला.
त्यानंतर त्यांनी शनीपेठ पोलीसांशी संपर्क करून चोरी झाल्याची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पाहणी करत पंचनामा केला. त्यानंतर एकनाथ सपकाळे यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षका चंद्रकांन धनके करीत आहे.