जळगाव, प्रतिनिधी | राज्यात यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे ३५८ पैकी ३२५ तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज (दि.४) येथील जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देवून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या जिल्ह्यात आपत्ती निवारणासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे?, अवकाळी पावसामुळे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत राज्य सरकारने काय सुचना दिल्या आहेत? व अवकाळी पावसामुळे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कोणते अधिकारी कोणत्या गावात केव्हा जाणार आहेत? या बाबतची महिती वेळोवेळी प्रसिद्ध करावी आणि त्याबाबतचे वेळापत्रक माहितीस्तव देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना मनसेचे जिल्हा नेते अॅड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे व तालुका अध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.