अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच येथे झालेल्या जाहीर सभेवेळी त्यांच्यासमोर निदर्शने करणाऱ्या पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर आकसातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप करून समितीने एका पत्रकाद्वारे शासनाचा निषेध केला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे मुख्यमंत्री धरण आम्हीच पूर्ण करणार असे सांगून कळवळा दाखवतात तर दुसरीकडे आंदोलकांवर जड कलम लावून गुन्हे दाखल केले जातात. मुळात सभेत निवेदन देण्यास अटकाव करण्यात आल्यानेच त्यांना रस्त्यात ताफा अडवून निवेदन द्यावे लागले होते. त्यामुळे हा आंदोलकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे, मात्र समिती यापुढेही आंदोलन सुरूच ठेवेल, असा निर्धारही या पत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे. या पत्रकावर सुभाष चौधरी, प्रा. शिवाजीराव पाटील, रणजीत बी. शिंदे व देविदास देसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.