जळगाव प्रतिनिधी | निवडणूक आयोग यांच्याकडून नियोजित निवडणूक प्रक्रिया वगळून ‘इतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यास मनाई राहील. अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, “राज्यात ‘कोविड – 19’ विषाणूच्या या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव / संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासन आदेश 8 व 9 जानेवारी 2022 अन्वये सुधारीत निर्बध लागू करण्यात आलेले आहेत.
शासन आदेशान्वये लागू केलेल्या सुधारीत निर्बंधामध्ये खासगी शिक्षण संस्था / खासगी सोसायटी यांच्याकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्याकामी परवानगी मिळण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अर्ज प्राप्त होत आहेत. मात्र, मा. भारत निवडणूक आयोग व मा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून नियोजित निवडणूक प्रक्रिया वगळून इतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यास मनाई राहील.
न्यायालयीन बाब असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये संबंधित संस्था, सोसायटी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्याकडे विशेष बाब म्हणून परवानगीकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. ज्या संस्था / सोसायटी यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झालेली आहे, अशा सर्व संबंधित संस्था / सोसायटी यांनी सदरील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, भारतय दंड संहिता, 1860 चे कलम 269,270, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी नमूद केले आहे.