जळगाव प्रतिनिधी । येथील निरभ्र निर्भय फाउंडेशनतर्फे कांताई सभागृहात जागर जाणीवांचा, जागर आत्मसन्मानाच्या कार्यक्रमात तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे, जगातील पहिले समलैंगिक राजकुमार मानवेंद्रसिंग गोहील व संजना जान व फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.मनीषा महाजन उपस्थित होत्या. या वेळी मान्यवरांच्या हस्ते हिना मेहंदी जान, नुरी जान करिश्मा जान, डावली संजना जान, तब्बो जान करिश्मा जान, नंदिनी जान, परी जान रेशमा जान, ममता जोगी व गुंजन जान या तृतीयपंथीयांचा पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गोहील आपल्या मनोगतात म्हणाले की, समलैंगिकता हा मानसिक आजार नसून निसर्गत: मिळालेली देण आहे. रामदेव बाबा यांनी समलैंगिकाला तीन महिन्यात पूर्ण मनुष्य करण्याचे जाहीर केले होते. शेवटी त्यांनाही हार मानावी लागली. संजना जान म्हणाल्या, आम्ही तुमच्यातलेच आहोत. तुमच्यासारखी आम्हालाही वागणूक द्या. तृतीयपंथीयांना सामाजिक अवहेलना सहन कराव्या लागतात. त्यांनाही भाऊ, दादा व ताई म्हणून सन्मानाची वागणूक द्या, ही आमची अपेक्षा आहे. डॉ.कोल्हे यांनीही मनोगत व्यक्त केले.