पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापकपदाच्या शासनमान्यता असलेल्या रिक्त जागांवर भरतीसाठी प्रक्रिया राबविली जाते आहे.विद्यापीठातर्फे यासंदर्भात सूचना जारी केली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे.
एकीकडे कार्यकाळ पूर्ण केलेले प्राध्यापक निवृत्त होत असताना दुसरीकडे भरतीप्रक्रिया रखडल्याने विद्यापीठात रिक्त जागांचे प्रमाण वाढत चालले होते. विद्यापीठाला नॅक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जायचे असताना निकषांमध्ये प्राध्यापकांचे समीकरण आडकाठी ठरण्याची शक्यता वर्तविली जात होती.या प्रकियेत मनुष्यबळाचा निकष महत्त्वाचा ठरणारा आहे. राज्य शासनाने प्राध्यापक भरतीला परवानगी दिल्यानंतर राज्यातील इतर विद्यापीठात भरतीप्रक्रिया हाती घेण्यात आलेली होती.
परंतु पुणे विद्यापीठात उशिराने का होईना प्रक्रिया हाती घेतली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत केला आहे.या पदांकरिता आरक्षण लागू असून, संबंधित जागेवर दावा करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल महाराष्ट्र ऑल बहुजन टीचर्स असोसिएशन विरुद्ध राज्य सरकार व इतर या याचिकेच्या अधीन राहून ही प्रक्रिया राबविली जाते आहे.अपात्र ठरलेल्या उमेदवारांना कुठल्याही स्वरूपाची माहिती विद्यापीठातर्फे कळविली जाणार नाही. मुलाखतीसाठी बोलाविलेल्या उमेदवारांनी स्वखर्चाने विद्यापीठात उपलब्ध राहायचे असल्याचेही नमूद केले आहे.
महत्त्वाच्या तारखा अशा-
अर्ज करण्याची मुदत – ३१ जानेवारी
अर्जाची मूळ प्रत देण्याची मुदत – १२ फेब्रुवारी
अशा आहेत भरतीसाठी उपलब्ध जागा-
प्राध्यापक -३२
सहयोगी प्राध्यापक -३२
सहायक प्राध्यापक -४७