यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कल्याण येथे वास्तव्य करणारे बहुपेडी प्रतिभेचे अधिष्ठान प्रा. विजय पाटील यांना “महाकवी कालिदास साहित्यिक गौरव पुरस्कार २०२५” ने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य, काव्य, अभिनय आणि गायन अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना नाशिक येथे झालेल्या रिमझिम काव्य संमेलनात गौरविण्यात आले.
यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथील रहिवासी असलेले प्रा. विजय पाटील सध्या कल्याणमधील प्रसिद्ध सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे साहित्य, विशेषतः गझल लेखन आणि अहिराणी भाषेतील योगदान, साहित्यिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गौरविले गेले आहे. २७ जुलै २०२५ रोजी नाशिक येथील कालिका माता मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महाकवी कालिदास स्मृतीप्रित्यर्थ रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका सौ. लतिकाताई चौधरी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, खजिनदार अर्जुन पाटील, परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सचिव प्रमोद कुंवर तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नरेंद्र खैरनार उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते प्रा. विजय पाटील यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
पुरस्कार वितरणानंतर प्रा. विजय पाटील यांनी स्वरचित अहिराणी गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या गझलेतील भावनाप्रधान शब्दरचना आणि स्वरसाजाने उपस्थित साहित्यप्रेमी मंत्रमुग्ध झाले. साहित्यिक आणि कलाक्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचे कौतुक महाराष्ट्रभरातून होत आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील साहित्यिक व काव्य क्षेत्रातील कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, तसेच वगुजर समाजातील जेष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या पुरस्कारामुळे ना केवळ प्रा. विजय पाटील यांचा सन्मान झाला आहे, तर खान्देशातील प्रतिभाशाली साहित्यिकांना एक नवा उत्साह मिळाला आहे. विविध कलाक्षेत्रांत सक्रिय असणाऱ्या युवकांसाठी हे प्रेरणादायी ठरणार आहे.



