जळगाव प्रतिनिधी। विदयापीठीय व महाविदयालयीन मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या अध्यक्षपदी विदयापीठातील प्रा.डॉ.सुधीर भटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ परिक्षेत्रातील संलग्न महाविदयालय आणि विद्यापीठातील मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या महासंघात समावेश असणार आहे.
बैठकीत यांची होती उपस्थिती
महासंघाच्या स्थापने संदर्भात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठात घेण्यात आलेल्या बैठकीत डॉ.भटकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.म.सु.पगारे होते. तर यावेळी प्रा.डॉ.जितेंद्र नाईक, अरूण सपकाळे, राजू सोनवणे, जयंत सोनवणे, अजमल जाधव यांच्यासह विद्यापिठातील विविध प्रशाळेतील प्राध्यापक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विदयापीठीय व महाविदयालयीन मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर महासंघात जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हयातील विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालय व विद्यापीठातील एस.सी.,एस.टी., एन.टी,. व्ही.जे.एन.टी. आदी मागास प्रवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सदस्य म्हणून समावेश असणार असून यांच्या विविध प्रश्नांबाबत हा महासंघ कार्य करणार आहे.
महामेळावा घेणार
विदयापीठीय व महाविदयालयीन मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर महासंघात जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हयातील विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालय व विद्यापीठातील एस.सी., एस.टी, एन.टी, व्ही.जे.एन.टी. आदी मागास प्रवर्गातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा महामेळावा जळगाव येथे घेण्यात येणार असून या संदर्भात लवकरच या संदर्भात तिन्ही जिल्हयातील मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या नियोजित महामेळाव्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न, समस्या, मागण्या यावर चर्चा करण्यात येणार आहे.