
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. प्रिती नितीन महाजन यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. “उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सायंटोमेट्रिक अभ्यास” या विषयावर त्यांनी केलेल्या सखोल संशोधनासाठी ही पदवी प्राप्त झाली आहे.
प्रा. प्रिती महाजन या मूळच्या पिळोदा (ता. जळगाव) येथील असून त्या शिक्षक दांपत्य गंगाधर रामदास पाटील व विमल गंगाधर पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे पती नितीन सुखदेव महाजन हे जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या औद्योगिक वसाहत शाखेत सहायक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. महाजन यांना शोधनिबंध लेखनासाठी एसएसव्हीपीएस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा येथील डॉ. तुषार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे, त्यांची महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नेमणूक स्व. गोदावरी पाटील यांच्या हस्ते झाली होती, म्हणून त्यांनी ही डॉक्टरेट पदवी गोदावरी पाटील यांना समर्पित केली आहे.
या यशाबद्दल त्यांनी संस्थेचे संस्थापक डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील व सदस्या डॉ. केतकी पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांचे पाठबळ आणि प्रेरणेमुळेच हे संशोधन शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.
लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स हे ज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील पूल बांधणारे महत्त्वाचे क्षेत्र असून माहितीचा सुयोग्य उपयोग, संकलन आणि प्रसार करण्याचे कार्य करत असते. प्रा. प्रिती महाजन यांच्या संशोधनातून या क्षेत्रात नव्या दृष्टीकोनाची भर पडणार असून, भविष्यातील संशोधक व ग्रंथपालांसाठी हे संशोधन मार्गदर्शक ठरणार आहे.
प्रा. प्रिती महाजन यांच्या या शैक्षणिक यशामुळे रजळगावसह जळगाव जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत असून, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



