प्रा.डॉ. ठाकरे यांना पहिला ‘यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार’ जाहीर

yc purskar

जळगाव, प्रतिनिधी | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या जळगाव विभागीय केंद्राच्या वतीने दिला जाणारा पहिला ‘यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार’ हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा.डॉ.एन.के. ठाकरे यांना जाहीर झाला असून शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या येथील विभागीय केंद्राचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 

दोन वर्षापूर्वी जळगाव शहरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे विभागीय केंद्र जळगाव येथे सुरु करण्यात आले. या दोन वर्षाच्या काळात जळगाव शहर व ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार आणि शेतकऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विभागात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा इतर क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.

या विभागीय केंद्राच्या वतीने यंदा प्रथमच दिला जाणारा हा पुरस्कार प्रा.डॉ. ठाकरे यांना जाहीर करण्यात आला आहे.१९९० मध्ये पुणे विद्यापीठातून स्वतंत्र होत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून प्रा.डॉ. ठाकरे यांनी पदभार स्वीकारला. आज हे विद्यापीठ ३० वर्षात पदार्पण करीत आहे. पहिल्या सहा वर्षात प्रा. ठाकरे यांनी या विद्यापीठाला जी दिशा दिली त्याचीच परिणीती म्हणून आज या विद्यापीठाने आपली स्वतंत्र ओळख शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केली आहे. कॉपी मुक्त परीक्षा, स्कूल पॅटर्न, अत्यंत खडकाळ परिसरात काटकसर करुन विद्यापीठाच्या बांधलेल्या विविध इमारती, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि या प्रयत्नांमुळे खान्देशातील आदिवासी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याबाबत निर्माण झालेली आस्था. अशी काही वैशिष्ट्ये त्यांच्या कारकिर्दीची आहेत. त्यांच्या या उच्च शिक्षणातील मौलिक योगदानामळे प्रा.डॉ. ठाकरे यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे उपाध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवनात शनिवारी सायंकाळी ५.०० वाजता हा पुरस्कार सोहळा होणार असून अध्यक्षस्थानी अॅड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील असतील. रोख १५ हजार रूपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्र समिती सदस्यांनी केले
आहे.

Protected Content