एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल बस आगारातर्फे एकही रातराणी गाडी सोडली जात नसून स्थानकावर बाहेरच्या आगाराची एकही बस गाडी मुक्कामाला राहत नसल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एरंडोल बस आगारातर्फे दरवर्षी एरंडोल ते पुणे ही रातराणी गाडी महिना-दोन महिन्यापर्यंत चालविली जात होती. मात्र काही वर्षापासून ही गाडी बंद करण्यात आली आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने याबाबत अधिक माहिती घेतली असता एरंडोल पुणे रातराणी बस गाडीवर ड्युटी करणारे वाहक व चालक यांना वाढीव भत्ता द्यावा लागतो. त्यामुळे एस टी. महामंडळाला सदर सेवा आर्थिकदृष्ट्या न परवडणारी आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, एरंडोल येथून दोन लक्झरी गाड्या पुण्याला सोडल्या जातात. त्या गाड्यामध्ये तिकीट न मिळाल्यामुळे काही प्रवाशांना जळगावला धाव घ्यावी लागते. यासाठी एरंडोल परिसरातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एरंडोल बस आगाराने एरंडोल ते पुणे रातराणी ही एकमेव रातराणी सेवा सुरु करावी व रातराणी सेवा न चालविणारा एसटी डेपो अशी ओळख होऊ देऊ नये, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.