मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यात सध्या घडत असलेल्या विघातक कृत्यांची चौकशी करून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
या संदर्भात वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यात सध्या राजकीय वर्चस्वाचा वाद पेटला असून यातून परवा रात्री रोहिणी खडसे यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमिवर, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार आणि पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन या सर्व विघातक कृत्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तीन-चार दिवसांपासून मुक्ताईनगरात राजकीय तणाव चिघळला असून समाज माध्यमांवरील टीकाटिपणीवरील वाद प्राणघातक हल्ल्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शांतता भंग होत असून परिणामी मुक्ताईनगर भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निंदनीय असून प्रशासनाने घटनेची चौकशी करून कारवाई करा, या मागणीचे निवेदन कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले.
निवेदन देतांना कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, बी.डी. गवई, ऍड.अरविंद गोसावी, ऍड.राहुल पाटील, निलेश भालेराव, निखिल चौधरी आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.