नवी दिल्ली । हाथरस प्रकरणावरून अतिशय आक्रमक भूमिका घेणार्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वधेरा यांनी केंद्र सरकारला पाच प्रश्न विचारले असून याची उत्तरे मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला विचारले आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की,
सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे
हाथरसच्या डीएसला निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये
आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?
आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?
आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देशाला मिळावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हाथरस प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या वतीने हे प्रश्न मोदी सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला विचारले आहेत.
हाथरस या ठिकाणी प्रियंका आणि राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबीयांना सुरुवातीला भेटू दिलेलं नाही. तिथे राहुल गांधी यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. या सगळ्या प्रकाराचा निषेध देशभरातून झाल्यानंतर तसंच या प्रकरणावरुन खूप टीका झाल्यानंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रियंका गांधी यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.