कर्नाटकातून शिर्डीला जाणाऱ्या खासगी बसची बिअर कंटेनरला धडक; १८ जण जखमी

शिर्डी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कर्नाटकातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक घेऊन जाणाऱ्या खासगी बस आणि कंटेनरचा अपघात झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला. खासगी बसमध्ये जवळपास ६० भाविक होते. यात चालकांसह १८ जण जखमी झाले आहेत. यामध्ये ४ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरेगाव शिवारात घडली.

मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कर्नाटक येथून दर्शनासाठी 60 भाविकांना घेऊन खासगी बस शिर्डीच्या दिशेने येत होती. बिअरनं भरलेला कंटेनर गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव शिवारात असणाऱ्या सीएनजी पंप समोर वळण घेत होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सनं त्या कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की, कर्नाटक ट्रॅव्हल्सचा समोरील भागा पूर्ण चकणाचूर झाला. सुदैवानं अपघातामध्ये जीवितहानी टळली.

स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य- ट्रॅव्हल्स बसने कंटेनरला जोरात धडक दिल्यानं मोठा आवाज झाला. स्थानिकांनी ग्रामीण पोलिसांना अपघाताबाबत माहिती देत तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. स्थानिकांनी सर्व भाविकांना बसमधून बाहेर काढलं. त्यात जखमी झालेल्या सर्व भाविकांना शहरातील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलं. या घटनेमध्ये बसचे खूप मोठे नुकसान झालं आहे. रुग्णांवर उपचार करून किरकोळ जखमी असलेल्यांना लगेच सोडण्यात आलं. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

Protected Content