जळगाव । येथील जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त असून यामुळे खळबळ उडाली आहे. तथापि, कारागृह प्रशासनाने याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून यात कैद्यावर ब्लेडने वार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एक बंदी इंटरकॉम फोनवरून पत्नीशी बोलत असताना दुसरा एक बंदी तिथे आला. त्यालाही आपल्या पत्नीशी बोलायचं होते. फोनवर बोलण्यावरून दोन्ही महिलांमध्ये वाद झाला. बाहेर दोघींचा वाद झाल्याने आतही दोन्ही कैद्यांची हाणामारी झाली. त्यात त्यांनी एकमेकांवर ब्लेडने वार केल्याचे समजते. वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, कारागृहाबाहेर दोन महिलांमध्ये वाद झाला. त्यातील एक महिला बंदी कैद्याची पत्नी असल्याने कारागृहात कैद्यांचाही किरकोळ शाब्दिक वाद झाला. त्यात एकाचे नाव इसाक शेख व दुसऱ्याचे नाव सतीश गायकवाड असल्याची माहिती कारागृह निरीक्षक अनिल वांढेकर यांनी दिली आहे.
याबाबत प्रभारी कारागृह अधीक्षक अनिल वाडेकर यांना विचारणा केली असता त्यांनी जेलमध्ये अथवा बाहेर कोणत्याही प्रकारची हाणामारी झाली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कारागृहात आजवर असा प्रकार झाला नसून आतादेखील अशी घटना घडली नाही. तसेच कारागृहात ब्लेड आणण्याची परवानगी नसल्यामुळे ब्लेडने वार करण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे ते म्हणाले.