भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव कारागृहातून भुसावळ येथे आणलेल्या दोन कैद्यांपैकी एका कैद्याने शौचालयाच्या खिडकीतून पळ काढल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे कोर्ट आवारात पोलिसांची मोठी धावपळ झाली होती.
या संदर्भात अधिक असे की, दाखल गुन्ह्यातील सुनवाईसाठी जळगाव सबजेलमधून बाबा कालिया व कलीम शेख या दोघांना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ कोर्टात आणण्यात आले होते. साधारण दीड वाजेच्या सुमारास कलीम शेख हा जेवणाला बसला. यावेळी बंदोबस्तावर असलेले तीन पोलीस त्याच्यासोबत बसले. तर बाबा कालीया नामक आरोपीने बाथरूमला जाण्याचा बहाणा केला. बाथरूममध्ये गेल्यानंतर त्याने खिडकीतून पळ काढला. बराच वेळ झाल्यानंतरही बाबा कालिया बाहेर न आल्यामुळे पोलिसाला संशय आला. त्यानुसार बघितले तर बाबा कालिया हा खिडकीतून पसार झालेला होता. आरोपीचा कसून शोध पोलीस प्रशासन घेत आहे.