
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने संतप्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या गाडीला घेराव घालून आपला संताप व्यक्त केला. थकीत पगाराबाबत कर्मचाऱ्यांनी जाब विचारला असता, अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुणे येथील ‘स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड’ या खाजगी कंपनीमार्फत ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या वर्ग ४ (साफसफाई) आणि वर्ग ३ (डाटा एन्ट्री ऑपरेटर) अशा २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या दोन महिन्यांपासून रखडला आहे. हे कर्मचारी मागील ११ महिन्यांपासून महाविद्यालयात कार्यरत आहेत. सुरुवातीचे काही महिने पगार वेळेवर मिळाला; मात्र आता दोन महिन्यांहून अधिक काळ वेतन थकले आहे.
पगार वेळेवर व्हावा यासाठी कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून मागणी करत होते. दोन महिने उलटून तिसरा महिना सुरू झाला असून, तिसऱ्या महिन्याचेही १५ दिवस झाले आहेत. त्यातच, उद्या, २ ऑक्टोबर रोजी दसरा असल्यामुळे सण साजरा करण्यासाठी वेळेवर पगार मिळणे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळेच, बुधवारी सकाळी ९ वाजता संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या गाडीला घेराव घातला आणि तत्काळ पगार देण्याची मागणी केली.
यावेळी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने स्मार्ट सर्व्हिस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना आज, संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचे आश्वासन दिले. अधिष्ठातांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपला घेराव मागे घेतला. मात्र, सणासुदीच्या काळातही कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न झाल्याने ठेकेदारी पद्धतीतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.



