जळगाव, प्रतिनिधी | नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे व बँकेचे अधिकृत चलन न भरता तडजोड करून टी.सी. दिले आहेत. याचा पाठपुरावा मी करत असल्याने देशमुख यांनी माझ्याविरुद्ध खोटे-नाटे बेछूट आरोप करीत माझी बदनामी चालवली आहे. त्यांच्याविरुद्ध मी लवकरच मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती पियूष नरेंद्र पाटील यांनी आज (दि.१२) येथे पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अ.भा.वि.प.चे रितेश चौधरी, छात्रभारतीचे निकिता सोनवणे, तेजस्विनी काळे, परमवीर जाधव, निखिल पोपटानी, अजिंक्य पाटील, सोज्वल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी पियुष पाटील पुढे म्हणाले की, प्राचार्य देशमुख यांनी संस्थेच्या वरणगांव येथील कॉलेजमध्ये त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती असताना संगणक व स्टेशनरी खरीदी प्रकारणात कोट्यावधींची बनावट बिले सादर करून त्यात अपहार केलेला आहे. याबाबत त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचा गुन्हा दाखल असून, त्याची चौकशी सुरु आहे. नूतन मराठा महाविद्यालयाचा यु.आर. म्हणून माझी बिनविरोध निवड झाल्यावर प्राचार्य देशमुख यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला होता. तो सर्व विद्यार्ध्यांना घेऊन चालणारा विद्यार्थी असून त्याचे काम सर्वांना आवडणारे आहे, असे मत व्यक्त केले होते. मात्र, आता प्राचार्यानी पत्रकार परिषद घेऊन माझी बदनामी करण्याची सुपारी घेतली आहे. असा आरोपही पियुष पाटील यांनी यावेळी केला.